छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीची शक्यता आहे. या बैठकीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावे, निधीबाबतची माहिती द्यावी, जिल्ह्याचा आणि विकास होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करुन सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात पर्जन्यमानाची स्थिती अतिशय गंभीर आहे. पाणी टंचाईचे सावट असल्यामुळे पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यासाठी मंडळनिहाय तपासणी करणे गरजेचे आहे. संभाव्य पाणी टंचाई ओळखून विभागात जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी. यासंदर्भात जिल्हा परिषद स्तरावर दर पंधरा दिवसांनी तर जिल्हाधिकारी स्तरावर दरमहा आढावा बैठक घेण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव सोहळ्यासाठी येणा-या राज्य मंत्री मंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. मात्र, अद्याप बैठकीसंदर्भात कोणतेही पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल विभागाला प्राप्त झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.