

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरात विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी (दि.१४) भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे व राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते अजय भिसे व भरत जाधव यांच्यासह शेकडो समर्थकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीत नगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी मुरकुटे-मुंडे जोडगोळी 'ऍक्टिव्ह मोड'वर आली आहे.
भाजपचे परभणी लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मुख्य उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते अजय भिसे व भरत जाधव या दोघांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मुरकुटे यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विठ्ठलराव रबदडे, व्यंकटराव तांदळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष भागवत बाजगीर, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, तुकाराम तांदळे, प्रशांत फड, अमोल दिवाण आदींची उपस्थिती होती.
गंगाखेड शहर हा भाजपचा बालेकिल्ला असून नगर पालिकेवर अनेक वर्ष भाजपची सत्ता होती. ती सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करावे, पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तसेच जनमत पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्याला यावेळी निश्चित निवडणुकीत संधी देण्यात येणार असून कुठल्याही परिस्थितीत पालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस भरत जाधव, संभाजी सेना तालुकाप्रमुख अजय भिसे, शैलेश चव्हाण, विनायकराव भिसे, पिराजी सोलव, गणेशराव काळे, भास्कर मामा भिसे, भगवानराव भिसे, बसवेश्वर लिंगायत , भारत पौळ, योगेश चोरघडे, आकाश धोंडगे, बबलू लोखंडे, कृष्णा चोरघडे, श्रीहरी मुरकुटे, प्रकाश भिसे, रामकिशन भोसले, दत्ता भिसे, कोडीबा भिसे, प्रल्हाद भिसे, यांच्यासोबत शेकडो नवतरुण मित्रांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.