वाचाळवीर नेत्यांना शिबीरात मानसोपचार द्या : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

वाचाळवीर नेत्यांना शिबीरात मानसोपचार द्या : उपमुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे तत्कालिन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबीराचा लाभ लाखो गरीब रुग्णांना होत आहे. या शिबीरात मानसोपचार तज्ज्ञ देखील आहेत. तेव्हा या शिबीरात राज्यातील काही वाचाळवीर राजकीय नेत्यांनाही बोलावून त्याच्यावरही तज्ज्ञांद्वारे मानसोपचार करावा. तसेच गरज भासल्यास त्यांना दाखलही करून घ्यावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली. शहरातील आयोध्यानगरी मैदानावर देवेंद्र सेवा सप्ताहनिमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटनानिमित्ताने ते शहरात आले होते.

यावेळी ग्राम विकास मंत्री महाजन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शिबबीराचे आयोजक राजेंद्र साबळे यांची उपस्थिती होती. महाआरोग्य शिबीरात बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी राज्यात युतीची सत्ता असताना मंत्री महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री पद होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक गरजू रुग्णांना एकाच ठिकाणी विविध आजारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध व्हावा, यासाठी महाआरोग्य शिबीर घेण्यात यावा. त्यांच्या या शिबीराला जनतेने भव्य प्रतिसाद दिला. तसेच या शिबीरामुळे लाखो रुग्णांवर मोफत उपचार झाले. तेव्हापासून हे शिबीर आयोजनावर भर दिला. दरम्यान, मधला कोरोनाचा काळ आणि युतीची सत्ता नसलेल्या काळामुळे हे शिबीर आयोजित करणे शक्य झाले नाही.

आता पुन्हा या शिबीराला सुरूवात झाली आहे. या चौथ्या वर्षाच्याचे शिबीर यंदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी लाखो रुग्णांनी नोंदणी केली आहे. खरोखरच हे अनंदाची गोष्टी आहे की, या शिबीरामुळे लाखो गरजवंत रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून मिळत आहे. मात्र या शिबीरात मानसोपचार तज्ज्ञांनाही बोलविण्यात आल्याचे दिसत आहे. हे बरे झाले, असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा विरोधकांकडे वळविला. अलिकडच्या काळात काही वाचाळवीर राजकिय नेते दररोज टि.व्ही.वर काहीही बोलत सुटले आहेत. त्यांची देखील स्क्रीनींग करून जर येथील शिबीरातील तज्ज्ञ मानसोपचारामार्फत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे राज्यचे आरोग्य सुधारेल व जनतेशी सुसंवाद साधता येईल, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. तसेच या कामाची जबाबदारी त्यांनी मंत्री महाजन यांच्यावर टाकली. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिबीरात मात्र एकच हशा पिकला.

समिती घेणार मंत्रिमंडळ, महामंडळ निर्णय

सकाळी चिकलठाणा विमानतळावर अगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटीवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर ते म्हणाले की, या भेटीची आपल्याला माहिती नाही. त्यामुळे या भेटीवर बोलणे योग्य होणार नसल्याचे सांगत बोलणे टाळले. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर बोलतांना ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांची समन्वय समिती घेईल.

मंत्री महाजन म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते योग्य आहे. महाराष्ट्राची संस्कृती काही ठरावीक राजकीय नेते बिघडवित आहेत. अगोदर अशा प्रकारचे राजकारण कोणीही नेते करीत नव्हते. त्यामुळे या नेत्यांना खरोखरच मानसोपचाराची गरज असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले.

Back to top button