बीड: हिंगणी शाळेत खिचडी शिजवणाऱ्या महिलेची शिक्षिकेला मारहाण

बीड: हिंगणी शाळेत खिचडी शिजवणाऱ्या महिलेची शिक्षिकेला मारहाण

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील शिक्षण विभाग काही ना काही घटनेने चर्चेमध्ये असतो. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवणारी महिला आणि एका शिक्षिकेमध्ये वाद झाला. दोघींनी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यासमोरच अक्षरशः एकमेकीचे केस ओढत मारहाण केली. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना पुरेसा दर्जेदार अन्न देण्याची मागणी करणाऱ्या शिक्षिकेसोबत महिलेने हुज्जत घातली. परंतु या प्रकारास शाळेच्या मुख्याध्यापक शिला बोळे या जबाबदार असल्याचे गावातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.

तालुक्यातील जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना पुरेशी खिचडी न देणे, दोन बिस्किटावर विद्यार्थीची बोळवण करणे, यासह दर्जेदार पोषण आहार न देता ओबडधोबड प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ताटात खिचडी टाकणे, हा प्रकार सातत्याने होत असतो. याबाबत शाळेतील कोरडे शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी महिलेकडे केली होती. तसेच महिलेचा पती शाळेच्या आवारात लघुशंका करत असल्याबाबत या महिलेने आपल्या पतीला समज द्यावी, असेही सांगितले होते. यावरून महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेसोबत हुजत घालत मारहाण केली.

शालेय समितीचे अध्यक्ष यांची आईच खिचडी शिजवण्याचे काम करते. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुरेसा आणि दर्जेदार आहार दिला जात नाही. त्यामुळे त्यांना चांगला आहार देण्याची मागणी शनिवारी केली होती. या कारणावरून महिलेच्या पतीने माझे हात पकडले व मारहाण करून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. रेखा डोंगरे व अश्विनी गवळी यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दिली आहे. मी खूपच मानसिक तणावामध्ये आहे.

– शोभा कोरडे, शिक्षिका

झालेल्या प्रकार हा खूप गंभीर असून याविषयी महिलेने तक्रार दिलेली आहे. दोन केंद्रीय मुख्याध्यापकांची समिती नेमून झालेल्या प्रकराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

– गणेश गिरी, गटशिक्षणाधिकारी                                                                                             

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news