छत्रपती संभाजीनगर : पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच जणांवर हल्ला! गायी-म्हैशींवरही झडप | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पिसाळलेल्या कुत्र्याचा पाच जणांवर हल्ला! गायी-म्हैशींवरही झडप

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी गाव परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका पाठोपाठ एक अशा तब्बल
पाच जणांचा चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांचे गावात फिरणे कठीण झाले होते.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी गावात घडलेल्या या घटनेत चार महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. सुभद्राबाई भीमराव भोसले (वय ६५ वर्ष), संगीता संजय साळवे (वय ४५ वर्षे), शशिकला पुंडलिक कळवत्रे (वय ३० वर्ष), जयश्री भास्कर सरोदे (वय २० वर्ष), अंकुश सवळकर (वय ४५ वर्ष) या व्यक्तींचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने कोणाच्या कानाचे तर कोणाच्या हाताला तर कोणाच्या पायाचा चावा घेतला. या सर्वांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कुत्र्याने म्हैस आणि गायीचे देखील लचके तोडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेने पिसाळलेल्या या कुत्र्याची माहिती आजूबाजूच्या गावांना दिली. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्यानंतर संबंधित कुत्र्याला पकडण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे.

नागरिकांची प्रतिक्रिया

संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याची इंजेक्शन लस हि प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळायला पाहिजे जेणेकरून गोरगरीब रुग्णांना औरंगाबाद सारख्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नाही औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात देखील रेबिजची इंजेक्शन उपलब्ध नसल्याने स्वतः आम्हाला विकत घ्यावे लागले.
– कैलास साळवे

Back to top button