

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या घटनेने देश हादरला आहे. त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कडक कारवाई करण्याची देशभरातून मागणी केली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर या घटनेबाबत संताप व्यक्त करत आहे. यावर आता राजकीय सुट्टीवर असलेल्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनीही मणिपूर घटनेवर संताप व्यक्त केला आहे. एक व्हिडीओच जारी करुन पंकजा मुंडेंनी प्रत्येक वेळी स्त्रीलाच का अग्निपरिक्षा द्यावी लागते ? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मणिपूरमध्ये ४ मे २०२३ रोजी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने देश सुन्न झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. अशातच आता राजकीय सुट्टीवर असलेल्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनीही या घटनेचा तीव्र निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंनी आपल्या युट्युब पेजवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून या भावना व्यक्त करत असल्याचे स्पष्ट करायला त्या विसरल्या नाहीत. कोणत्याही परिस्थितीत महिलांना कोणत्याही खेळातलं प्यादं म्हणून वापरलं जाऊ देता कामा नये.प्रत्येक वेळी स्त्रीलाच का अग्निपरिक्षा द्यावी लागते ? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.आरोपींना फाशी द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.