नांदेड: पावसाचे रौद्ररूप, देगलूर शहरासह परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी | पुढारी

नांदेड: पावसाचे रौद्ररूप, देगलूर शहरासह परिसराची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

उमरखेड, देगलूर, पुढारी वृत्तसेवाः सुगाव, वन्नाळी,लख्खा, सावरगाव आणि मनसकक्करगा व देगलूर शहरासह परिसरातील ढगफुटीमुळे रस्ते, शेती आणि घरांच्या व जनावरांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची  प्रत्यक्ष पाहणी केली.  जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ भरपाईसाठी शासकीय आर्थिक मदत देण्याचे व पूरग्रस्तभागात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्व गावकऱ्यांना दिले.

दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.  ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील चातारी परिसरातील गावांना बसला आहे.

चालगणी कॅनल बोरी फुटल्यामुळे संपूर्ण गावाला पाण्याने विळखा घातला आहे. यामध्ये अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. अचानक पाण्याचा लोंढा आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुसळधार पावसामुळे चातारी मधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून गावाचा संपर्क तुटला आहे.

तसेच शहरातील ढाणकी रोड, ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,  बाजारपेठ , नाग चौक, रहीम नगर , ताजपुरा वार्ड, तांबुळपुरा ,शिवाजी वार्ड आदी ठिकाणी पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने ईसापूर धरणावरील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

गुरुवारी तालुक्यात सरासरी 70 ते 75 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच चातारी परिसरात 156 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या पावसामुळे उशीरा पेरण्या केलेल्या सोयाबीन, कापूस, हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस भुईसपाट झाला आहे. जमिनी मोठ्या प्रमाणावर खरडली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तसेच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . तहसीलदारांनी  चातारी व परिसरात जाऊन पाहणी केली.  त्यांनी  सर्वे करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तुटलेल्या कॅनॉलची दुरुस्ती ताबडतोब करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button