वाशिम : आरटीओ कार्यालयाजवळ धूम स्टाईलने महिलेच्या दागिन्यांची चोरी

वाशिम : आरटीओ कार्यालयाजवळ धूम स्टाईलने महिलेच्या दागिन्यांची चोरी

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशिममध्ये आरटीओ कार्यालयाजवळ  चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने पळविल्याची घटना सोमवारी (दि. १० जुलै) सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली. सिंधू माधवराव अंभोरे यांनी या चोरीची वाशिम शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.

दरम्यान सिंधु माधवराव अंभोरे ह्या सोमवारी (दि. १० जुलै) सायंकाळी ६ वाजता जिल्हा न्यायालयातून मुलीच्या घरी जात होत्या. दरम्यान अवचार कॉम्प्लेक्स नजीकच्या घरकुलाजवळ एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात युवकाने महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ हिसकावून पोबारा केला. अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये किंमतीची हे सोने होते अशी माहिती अंभोरे यांनी दिली. संबंधीत महिलेने आरडाओरड केली मात्र, चोरटा दुचाकीवरुन धूम स्टाईलने आरटीओ कार्यालयासमोरुन सिव्हील लाईनकडे पळून गेला. अशी माहिती सिंधु अंभोरे यांनी वाशिम शहर पोलीसांना दिली.

विशेष म्हणजे अत्यंत वर्दळीच्या तसेच सर्व शासकीय कार्यालय असलेल्या परिसराजवळ अशाप्रकारे महिलेच्या गळयातून सोन्याची पोथ अज्ञात चोरटयाने लंपास केल्याने परिसरातील महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम शहर पोलीसांनी याप्रकरणी त्वरीत तपास सुरु केला. शहरातील काही सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले. मात्र, आरोपी सापडू शकला नाही. या प्रकरणातील आरोपी लवकरच आम्ही जेरबंद करु असे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहीते यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पीएसआय सचिन गोखले, हेड कॉ.रामकृष्ण नागरे एच.एस.सी. श्रीवास्तव डी.बी. पथक करीत आहे.

यापूर्वीच्या दागिने पळविल्याच्या घटना पोलीसांकडून उघड

महिलांच्या गळयातील सोन्याची पोथी दुचाकीवरुन येवून पळविल्याच्या घटना वाशिम शहरात गेल्या वर्ष दिड वर्षात घडल्या. मात्र, त्यातील तीन घटनांचा शोध पोलिसांनी लावला अशी माहिती शहर पोलिसांतून देण्यात आली. शुक्रवारपेठ गुरांच्या दवाखान्याजवळील महिलेच्या गळ्यातील पोथ पळविण्यात आली होती. तसेच झाकलवाडी रोडवरील गुरुकुल शाळेजवळ मारहाण करुन सोन्याची चैन, लॉकेट पळविण्यात आले होते. याचप्रकारे नविन आययुडीपीतील अग्नीशमन कार्यालयाजवळ महिलेच्या गळयातील सोन्याची पोथ पळविण्यात आली होती. पोलीसांनी या सर्व प्रकरणातील आरोपींना मुद्देमालासह अटक केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news