दीड एकर शेती त्यात अतिवृष्टीने पिकांसह शेत खरडून गेले. खर्च तर निघाला नाही कर्ज कसं फेडायचे अन दिवाळी कशी करायची या विवंचनेतून अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारच्या (दि २५) च्या मध्यरात्री घडली. रामभाऊ नारायम कदम (वय ५८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरात रात्री पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.
कदम यांच्याकडे दीड एकर शेतजमीन असून शेतात ऊस व कपाशी पिके होती. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेताजवळ असलेल्या गल्हाटी नदी पात्राला महापूर आला. शेती पूर्णपणे खरडून गेली. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून निराश होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक गोंदी शाखेचे ५१ हजाराचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे? या विवंचनेत ते होते. या विवंचनेतूनच रामभाऊ कदम यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेनची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. रामभाऊ कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातू, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
अंबड तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले असून, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.