पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप; हिंगोली न्यायालयाचा निकाल

जन्मठेप
जन्मठेप

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे अनैतिक संबंधात अडथळा आणणाऱ्या पतीचा झोपेतच गळा आवळून खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप व ५००० रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांनी मंगळवारी (दि. १३) दिला आहे.

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील सरस्वती त्र्यंबक कुरवाडे हिचे गावातील शिवाजी मुळे या व्यक्ती सोबत अनैतिक संबंध होते. या संबंधामध्ये त्र्यंबक कुरवाडे अडथळा आणत होते. याप्रकारामुळे सरस्वतीबाई हिने २८ जून २०१७ रोजी तिचा पती त्र्यंबक हे झोपेत असतांनाच त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी मृत त्र्यंबक यांचा भाऊ संतोष कुरवाडे यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सरस्वती कुरवाडे व शिवाजी मुळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.सदर प्रकरणात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी येवते यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर. व्ही. लोखंडे यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते.या प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरस्वतीबाई हिस खूनाच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेप व ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर शिवाजी मुळे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सविता देशमुख, ॲड. एस. डी. कुटे यांनी सहकार्य केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news