Ashadhi Ekadashi 2023 : नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

Ashadhi Ekadashi 2023 : नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे ५०० पेक्षा अधिक वारकरी सहभागी होणार आहे. या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण दुपारी चार वाजता हिंगोलीत रामलीला मैदानावर होणार आहे. (Ashadhi Ekadashi 2023)

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून मागील २८ वर्षापासून संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे काढला जातो. यावर्षीही पालखी सोहळा निघणार आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता पालखी नर्सी नामदेव येथून पंढरपूरकडे निघणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे ५०० पेक्षा अधिक वारकरी सहभागी होणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी चार वाजता पालखी हिंगोलीत पोहोचणार आहे.

हिंगोलीत रामलिला मैदानावर पहिले रिंगण होणार आहे. त्यानंतर पालखीचा हिंगोलीत मुक्काम राहणार आहे. त्यानंतर औंढा नागनाथ, बाराशिव, हट्टा, परभणी, पोखर्णी, गंगाखेड, शुक्रवारी उक्कडगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, बोरी सावरगाव, वडगाव रामा, मसा, दगड धानोरा, खांडवी, चिंचगाव, लहुळ, आष्टी, मार्गे पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज झाले आहेत.या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण शुक्रवारी हिंगोलीत, दुसरे रिंगण १७ जून रोजी परळी वैजनाथ येथे दुपारी चार वाजता, तिसरे रिंगण १८ जून रोजी अंबाजोगाई येथे दुपारी चार वाजता तर चौथे रिंगण २० जून रोजी सकाळी दहा वाजता जऊळबन येथे होणार आहे.

Back to top button