Beed Crime : बीडमध्ये सिनेस्टाईल लुटमारी; वसुली केलेल्या साडे चार लाख रकमेवर चोरांचा डल्ला | पुढारी

Beed Crime : बीडमध्ये सिनेस्टाईल लुटमारी; वसुली केलेल्या साडे चार लाख रकमेवर चोरांचा डल्ला

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बस स्थानकासमोर सिनेमातल्या लुटमारीसारखा प्रसंग घडला आहे. या लुटमारीत जवळपास चार लाख नव्वद हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही रक्कम घेऊन लुटमार क्षणार्धात परागंदा झाले. या सिनेस्टाईल लुटमारी प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रमेश ज्ञानोबा पाचनकर (वय ५८ वर्षे रा. कडबा मार्केट परळी वै) यांनी या घटनेची फिर्याद दिली. ते परळीतील एका व्यापाऱ्याकडे नोकरीस आहेत. या व्यापाऱ्याच्या विविध ठिकाणच्या उधारी वसुलीचे काम पाचनकर करतात. काल (दि ७) रात्री देखील ते विविध ठिकाणाहून वसुली करून रात्रीच्या सुमारास परळीत दाखल झाले. बस स्थानकाच्या समोरील रस्त्यावरून आझाद चौकाकडे ते पायी चालत होते. येवेळी पाठीमागून येणाऱ्या स्कुटीवरील तिघाजणांनी वेगाने येत पाचनकर यांच्या हातातील बॅग हिसकावली. ही बॅग घेऊन ते क्षणार्धात परागंदा झाले. पाचनकर यांना काय सुरु आहे हे कळण्याअगोदरच हा सर्व प्रकार घडला. या बॅगमध्ये त्यांच्या मालकाची चार लाख ९० हजार ८६० रुपये एवढी रक्कम होती.

याप्रकरणी त्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ हे करीत आहेत.

Back to top button