हिंगोली : बनावट सोने देऊन फसवणूक करणार्‍या महावितरणच्या तोतया अभियंत्याला अटक | पुढारी

हिंगोली : बनावट सोने देऊन फसवणूक करणार्‍या महावितरणच्या तोतया अभियंत्याला अटक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः महावितरणच्या तोतया अभियंत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली असून त्याने अनेकांना बनावट सोने देऊन गंडविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला असून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात बनावट सोने विक्री केल्याचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा शिवारात एका कारमधील व्यक्ती बनावट सोने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या पथकाने साध्या वेशात दुचाकी वाहनावर सेलसुरा शिवारात धाव घेतली.

पोलिसांनी त्या ठिकाणी एका कारवर महाराष्ट्र शासन, महावितरण कंपनी असे स्टिकर आढळून आले. पोलिसांनी कार मधील योगेश सुभाष इंगोले (रा. लासीना, ता.हिंगोली) याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन वीज कंपनीत अभियंता असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी ओळख दाखविल्यानंतर त्याचा बनाव उघडा पडला. योगेश हा विज कंपनीत अभियंता नसल्याचे स्पष्ट झाले. तर त्याने संतोष देशमुख नावाच्या व्यक्ती सोबत बनावट सोने गहाण ठेवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आता संतोष देशमुख याचा शोध सुरु केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी योगेश याच्याकडून महवितरणचे अभियंता असल्याचे बनावट ओळखपत्र, एक कार, मोबाईल जप्त केले आहे. त्याने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात बनावट सोने विक्रीचे गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. हिंगोलीत बनावट अप्पर जिल्हाधिकार्‍यानंतर आता बनावट अभियंत्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button