हिंगोली : सेवानिवृत्त जवानाचा हवेत गोळीबार; गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : सेवानिवृत्त जवानाचा हवेत गोळीबार; गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी शिवारात एका बिअर बारसमोर सैन्यातील सेवानिवृत्त जवानाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात काल (सोमवार) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. तर पांगरा शिंदे रेल्वे गेटवर एक गोळी हवेत फायर केल्याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील जवान साहेबराव धुराजी रणवीर हे सुमारे तीन ते चार महिन्यापुर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास ते बोल्डा ते उमरा मार्गावरील येहळेगाव गवळी शिवारात लिला बार आणि रेस्टॉरंट समोर आले होते. यावेळी त्यांनी कुठलेही कारण नसताना त्यांच्याकडे परवाना असलेल्या पिस्टलमधून एक गोळी हवेत फायर केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी लिला बार ॲन्ड रेस्टॉरंटचे चालक नंदकुमार मंदाडे यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यामध्ये सेवानिवृत्त जवान साहेबराव रणवीर याने विनाकारण हवेत एक गोळी फायर करून दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी सेवानिवृत्त जवान साहेबराव रणवीर यांच्या विरुध्द भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, या जवानाने पांगरा शिंदे रेल्वेगेटवर एक गोळी हवेत फायर केली. या प्रकरणातही कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button