नांदेड : मष्‍णेर देवस्‍थानाकडे दुर्लक्ष; पार्किंगच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

 मष्‍णेर देवस्‍थान
मष्‍णेर देवस्‍थान

हाणेगाव ; पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना या तीन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मष्णेर देवस्थान म्‍हणजे अनेक लोकांचे श्रद्धास्‍थान आहे. दर आठवड्यातील (मंगळवार) या दिवशी मोठ्या यात्रेचे स्वरूप या ठिकाणी लाभते. या मष्णेर देवस्थानाजवळ लग्न झालेल्या जोडप्यांची बाशिंग सोडवण्यासाठी भाविक येत असतात. मष्णेर देवस्थानाला नवसापोटी कंदुरीचे कार्यक्रम घेऊन येणाऱ्या हजारो भाविक येत असतात. अशा भाविकांच्या सोयी सुविधांचा मात्र बोजगारा उडाला आहे. त्‍यातूनच भाविकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

देगलूर तालुक्यातील लोणी गावाजवळ डोंगराळ भागात भाविकांना नवसाला पावणारा मष्णेर या देवस्थानचे मंदिर आहे. दर मंगळवारी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्‍यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. त्यात मरखेल पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने दर मंगळवारी नवस घेऊन आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीचा बोजवारा उडाल्‍याचे दिसून येते. यातूनच वादाचे प्रसंगदेखील उद्भवतात.

वाहनांच्या पार्किंगचे नियोजन केले नसल्याने परिसरात वाहने रस्त्यामध्येच लावली जातात. यातूनच ट्राफिक जाम होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. अशा प्रकारातूनच गेल्या मंगळवारी वाहने लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील दगडफेकीमध्ये अनेकांचे डोके फुटले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. असे असताना या दोन्ही गटांकडून पोलिस स्‍टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

मष्णेर देवस्थान परिसराकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्‍याने यात्रेतील व्यवसायिक, भाविकांनी आपल्या समस्या कुणाकडे मांडायच्या असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाला यात्रेसाठी मष्णेर देवस्थानाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांशी काही देणे घेणे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

मष्‍णेर देवस्‍थानात दर मंगळवारी मरखेल पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी उपस्‍थित असल्‍यास या ठिकाणचा गोंधळ आटोक्‍यात राहू शकतो. मात्र पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर मष्णेर देवस्थान येथे अवैध दारू विक्री सुरू असल्‍याने यातून भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news