बीड : माजी उपसरपंचाची विधवा महिलेला मारहाण! तिघांविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | पुढारी

बीड : माजी उपसरपंचाची विधवा महिलेला मारहाण! तिघांविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात फायनान्सच्या आर्थिक व्यवहारातुन माजी उपसरपंचासह तिघाजणांनी एका विधवा महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी माजी उपसरपंच, त्याचा भाऊ आणि मेव्हणा यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, सोमवारी (दि. २२ मे) साळेगांव येथे एका फायनान्स संस्थेच्या महिला सदस्यांची बैठक सुरू होती. माजी उपसरपंच अमर मुळे यांचा मेव्हणा मनोज घेवारे याने फायनान्स गटाच्या महिला अध्यक्षांना या आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून शिवीगाळ केली आणि अंगाशी झटापट केली. तसेच पुन्हा काही वेळाने माजी उपसरपंच अमर मुळे, त्याचा भाऊ अजय मुळे आणि त्यांचा मेव्हणा मनोज घेवारे यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या बहिणीला या जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फायनान्सचे कर्मचारी रहीम शेख यांना देखील मारहाण केली. त्यानंतर अमर मुळे म्हणाला की, जर आमच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला दिली.

या अन्याय अत्याचार प्रकरणी पीडित विधवेने केज पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. माजी उपसरपंच अमर मुळे, त्यांचा भाऊ अजय मुळे आणि त्यांचा मेव्हणा मनोज घेवारे या तिघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ यांसह इतर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button