UPSC Result : दोनशे मुलांना डॉक्टर बनवत यूपीएससीमध्ये ‘अतुलनीय’यश | पुढारी

UPSC Result : दोनशे मुलांना डॉक्टर बनवत यूपीएससीमध्ये ‘अतुलनीय’यश

बीड; पुढारी वृत्तसेवा : युपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना अहोरात्र अभ्यासाशिवाय इतर कुठलाही विषय डोळ्यासमोर नसतो… पण याला अपवाद असलेल्या डॉ.अतुल ढाकणे यांनी निटची तयारी करणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यातील दोनशे मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न मोफत पूर्ण केले. याबरोबरच स्वतःही यूपीएससीत यश मिळवले. त्याच्या या अतुलनीय यशाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक हे मुळ गाव असलेला अतुल शिक्षणासाठी गेवराई, अंबाजोगाई, बीड सारख्या ठिकाणी राहिला. वडील निवृत्ती ढाकणे हे मादळमोही येथील मोहिमाता विद्यालयात शिक्षक असल्याने मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते प्रारंभापासून आग्रही असायचे. यातूनच अतुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण गेवराई येथे, त्यानंतर अंबाजोगाई व मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण बीडमध्ये सेंट अ‍ॅन्स स्कुलला झाले. डॉक्टर व्हायचे असल्याने साहजिकच अतुलही लातूरला पोहचला. परंतु त्या ठिकाणच्या नामांकित संस्थेमध्ये त्याला प्रवेश मिळू शकला नाही. यामुळे खचून न जाता तेथेच दुसर्‍या महाविद्यालयात प्रवेश घेत यश मिळवले. पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणे सुरु केले. या दरम्यान त्याच्यातील सामाजिक कार्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. स्वतः शिकत असतांना त्याने इतर विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची होत असलेली आर्थिक ओढाताण त्याने पाहिली होती. इच्छा, पात्रता असूनही केवळ आर्थिक क्षमता नसल्याने डॉक्टर होता येत नाही, अशा मित्रांची अवस्थाही त्याने पाहिली होती. हे चित्र बदलण्यासाठी अतुल व त्याच्या मित्रांनी मिळून 2015 मध्ये लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट ही संस्था पुणे येथे स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून नीटची तयारी करणार्‍या केवळ गरजु आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफ त मार्गदर्शन सुरु केले. या संस्थेच्या माध्यमातून आजवर दोनशे विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस सारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकले.

हे सर्व करत असतांना स्वतः डॉक्टर झाल्यानंतर युपीएससीसाठी अतुलने थेट देशाची राजधानी दिल्ली गाठत तयारी सुरु केली. मंगळवारी जाहीर झालेल्या युपीएससी निकालामध्ये त्याचा 737 वा रँक आला आहे. गरजवंतांना मदतीचा हात देत यश मिळवून देणार्‍या अतुलचे हे अतुलनीय यश खरोखरच अभिनंदनिय आहे !

Back to top button