

बीड, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा बीडमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेना नेते बीडमध्ये आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व शिवसेना नेता सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी आपण सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा अप्पासाहेब जाधव यांनी व्हीडीओतून केला आहे. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनीही जाधव यांना मारहाण केल्याची चर्चा आहे.
बीड येथे शनिवारी खा.संजय राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा होणार आहे. त्या अगोदरच शिवसेनेच्या दोन गटामध्ये राडा झाला. शुक्रवारी सायंकाळी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे यांच्यासह काही नेतेमंडळी आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात वाद झाला. यादरम्यान जाधव यांना मारहाण झाल्याचे तसेच त्यांच्या गाडीचीही तोडफोड झाल्याची चर्चा प्रारंभी होती. मात्र यानंतर जाधव यांनी एक व्हीडीओ प्रसारित करुन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या पदासाठी पैसे घेत असल्याचा दावा करत आपले पदही त्यांनी कोणाला तरी विकले असल्याचे म्हटले. तसेच बीडमध्ये झालेल्या गोंधळावेळी त्यांना मारल्याचेही त्यांनी व्हीडीओत म्हटले आहे. या सर्व प्रकाराने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.