अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Buldhana Crime : ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन खून करणारा नराधम गजाआड

Published on

बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा : चिखली तालुक्यात एका मंदिराच्या प्रांगणातून ६ वर्षीय बालिकेला भरदिवसा पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणा-या नराधमास अंढेरा पोलिसांनी बुधवारी (दि. १७) गजाआड केले आहे. आरोपी हा त्याच मंदिरासमोर पूजा प्रसाद साहित्याची विक्री करत होता. त्याचे नाव सदानंद भगवान रोडगे (वय २४) आहे. मंदिरामागे काही अंतरावर अमानुष व घृणास्पद कृत्य केल्याचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. अज्ञात आरोपीच्या अटकेसाठी पोलीस प्रशासनावर मोठा दबाव वाढला होता. घटनेच्या निषेधार्थ सोमवारी चिखली शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. आज बुधवारी संशयित आरोपीला पोलीसांनी गजाआड केले.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, पीडित ६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह रोहडा येथील मंदिरात नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी आली होती. दरम्यान मंदिराच्या प्रांगणात खेळत असताना सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. तिचा आसपास शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने तीच्या आईने अंढेरा पोलीसांत तक्रार दिली होती. पोलीस व नागरिक बेपत्ता पिडित मुलीचा शोध घेत असतांना दुसऱ्या दिवशी मंदिरामागे ५०० मीटर अंतरावरील नाल्यात दगडाच्या ढिगा-खाली तिचा मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा दगडाने ठेचलेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत मुलीचे शवविच्छेदन करून घेतले. बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. यामध्ये पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करुन गळा आवळून खून केल्याचे समोर आले.

दरम्यान पोलिसांच्या तपास पथकाने रोहडा येथील‌ संबंधित मंदिरासमोरील पूजा प्रसाद साहित्य विक्रेत्यांची चौकशी केली. त्यातील एक विक्रेता सदानंद भगवान रोडगे याच्या हातावर, गालावर नखाने खरचटल्याचे निशान दिसून आले. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवला असता त्याने पिडीत बालिकेवर मिठाईचे आमिष दाखवून अत्याचार करून खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून नराधम आरोपीला गजाआड केले आहे. गुरुवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एसडीपीओ विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news