Water Heater Explosion : पाण्याच्या हिटरचा स्फोट! दोन वर्षाच्या चिमुकल्यासह चौघाजणांना भाजले, तर एकाची प्रकृती गंभीर जखमी | पुढारी

Water Heater Explosion : पाण्याच्या हिटरचा स्फोट! दोन वर्षाच्या चिमुकल्यासह चौघाजणांना भाजले, तर एकाची प्रकृती गंभीर जखमी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजूरा येथे हिटरचा स्फोट होऊन दोन वर्षांच्या चिमुकल्यासह चौघे जण भाजल्याची घटना मंगळवारी सकाळी पाच वाजता घडली. यामध्ये भाजलेल्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील राजूरा येथे बालाजी साहेबराव मुंडे यांचे घर आहे. मंगळवारी पहाटे त्यांच्या पत्नी ध्रुपताबाई मुंडे यांनी पाणी तापविण्यासाठी हिटर लावलेले होते. त्यानंतर त्या परत झोपी गेल्या. दोन तासानंतर हिटरचा स्फोट होऊन उकळते पाणी बाजूला झोपलेल्या मुंडे कुटुंबियांच्या अंगावर पडले. साहेबराव मुंडे, ध्रुपताबाई मुंडे, दोन वर्षाचा चिमुकला गणराज मुंडे यांना या दुर्घटनेत गंभीर भाजले. अचानक अंगावर उकळते पाणी पडल्यामुळे तिघेही घाबरून ओरडू लागले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या चौघांवरही रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची चौकशी केली. त्यांची आर्थिक परिस्थिती बेतातीच असल्याने गंंभीररित्या भाजलेल्या चिमुकल्यावर पुढील उपचारासाठी प्रश्‍न निर्माण झाला. मात्र आमदार बांगर यांनी तातडीने अकोला येथील खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधून चिमुकल्या गणराज याला उपचारासाठी अकोला येथे हलविले. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले.

Back to top button