परभणी : सात हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक एलसीबीच्या जाळ्यात | पुढारी

परभणी : सात हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक एलसीबीच्या जाळ्यात

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : केहाळ येथील ग्रामसेवकाने लाच घेतल्याने प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. सोमवारी (दि. १५ मे) जिंतूर पंचायत समिती कार्यायलासमोरील एका हॉटेलवर सात हजार रुपयांची लाच स्विकारताना या ग्रामसेवकाला ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्‍वर उत्तम राठोड (वय २९) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.

तालुक्यातील एका तक्रारकर्त्याने वडीलांच्या नावाने शासनाच्या आदिवासी समाजासाठी असणार्‍या शबरी घरकूल योजनेंतर्गत घरकूल प्रस्ताव मंजूर करण्याकरीता तसेच नमूना नंबर आठचा उतारा काढण्याकरीता ग्रामसेवकाशी संपर्क साधला. ग्रामसेवक राठोड यांनी तक्रारकर्त्यास २८ एप्रिल रोजी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तेव्हा या तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांकडे धाव घेतली. या खात्याच्या पथकाने पडताळणी केली तेव्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे सोमवारी या पथकाने जिंतूर येथील पंचायत समिती समोरील एका हॉटेलवर संबंधित ग्रामसेवकास ७ हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

दरम्यान, या प्रकरणात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलींद हनुमंते, अतूल कदम, शेख मुख्तार, शेख झिब्राईल, चालक जनार्दन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Back to top button