

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलचे सर्व १८ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून. महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुवा उडवून पालकमंत्री भुमरे यांनी पुन्हा एकदा बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सोमवार (१ मे) रोजी सकाळी पंचायत समिती सभागृहात तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सुरुवातीपासूनच पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवारांनी आघाडी कायम ठेवून पॅनलच्या विजयाचे संकेत दिले होते. अपेक्षाप्रमाणे महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या १८ उमेदवारांपैकी एका जागेवरही विजय मिळविता आला नाही. सहकार क्षेत्रावर मजबूत पकड निर्माण केलेल्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक दिवसापासून वर्चस्व आहे. या निवडणूकीतून हे वर्चस्व अबाधित राहिले आहे.