परभणी : बिबट्या शेतात मृतावस्‍थेत आढळला | पुढारी

परभणी : बिबट्या शेतात मृतावस्‍थेत आढळला

रेनाखळी ; पुढारी वृत्‍तसेवा पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथील आत्माराम दत्तात्रय हरकळ यांच्या शेतात आज (शनिवार) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रेनाखळी शिवारात पैठणच्या डाव्या कालव्याखाली पाण्याचे क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात उसाचे पीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सावली व थंड हवेमुळे दरवर्षी या ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडत असते. त्यामुळे शेतकऱ्यांत नेहमीच भितीचे वातावरण असते. आपला जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना आपल्या पिकांना रात्री व दिवसा पाणी द्यावे लागते.

गेल्या दोन ते तीन दिवस अगोदर दत्तात्रय बाबासाहेब हरकळ यांचे म्हशीचे पिल्लू व कुत्रे बिबट्याने खाल्ल्याची चर्चा असताना आज हा बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने पाहणाऱ्यांची गर्दी उसळली होती. बिबट्या जाळीत अडकल्याची बातमी कळताच गावातील लोकांनी व शेतकर्‍यांनी या ठिकाणी धाव घेतली.

यावेळी बघ्‍यांना कुठलीही हानी पोहोचू नये म्हणून पाथरी पोलीस स्टेशनचे पीएसआय बुद्धिराज सुकाळे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह हजर झाले. गावातील लोकांनी वन अधिकाऱ्यांना कळवले होते. बिबट्या जाळीत अडकल्याचे पाहून शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र बिबट्या मृत पावल्याने शेतकऱ्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय सुकाळे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button