

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत येथील प्रसिद्ध असलेल्या अंधारवड मारुती मंदिराला बैलगाडी ओढण्याच्या पारंपारिक कार्यक्रमात अपघाताची घटना घडली. बैलगाडीवरून पडल्याने ३ युवक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ६) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. या तीन पैकी २ युवकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणीला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
भीमसिंग बजरंगसिंग ठाकूर (वय २८), श्याम राजेभाऊ दहे (वय १८), राजेश प्रल्हाद बारहाते (वय २०) असे जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. गुरुवारी (दि. ६) सायंकाळी ५ च्या सुमारास ते राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अंधारवड मारुती मंदिरात गेले होते. मारुती जन्मोत्सव निमित्ताने याठिकाणी दरवर्षी मानाच्या ५ बैलगाड्या माणसांच्या हाताने ओढल्या जातात. बैलगाडीवर अनेक जण बसतात व उभे असतात. गाड्या ओढण्याचा मानाचा कार्यक्रम सुरू असतानाच बैलगाडीतील ३ युवक खाली पडले व जखमी झाले. येथील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर ३ पैकी राजेश बारहाते व भीमसिंग ठाकूर यांना परभणीच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.