”मविआ सरकार पायउतार होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगितले होते” : अजित पवार | पुढारी

''मविआ सरकार पायउतार होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी सांगितले होते'' : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती महाविकासआघाडीची सभा आज (दि. २) संभाजीनगरमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-ठाकरे गट या तीनही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यावेळी बोलत होते.
यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होते की, आपला उद्देश तळापर्यंत पोहोचवण्यासाठी या सभा घेऊ. पण तेव्हा कोरोनाचा काळ असल्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही. नंतर काही राजकीय घटना घडल्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे मविआ सरकार पायउतार झाले.

मविआची ही आजची पहिलीच भव्य सभा आहे. प्रत्येक विभागात अशा सभा घेणार आहोत. मविआ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सगळे जीवाचं रान करतील. सगळे कार्यकर्ते मविआचा कणा या नात्याने लढतील असं मत पवार यांनी व्यक्त केले.

हे सरकार मराठवाड्याची उपेक्षा करत आहे अशी टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली. काहीजण फक्त वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाही. राज्यातले वातावरण चांगले राहिलेले नाही, असे होत असेल तर कुणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही.

उद्धव ठाकरेंच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग इथे येत होते. यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष कोणाला द्यायचा? ७५ हजार नोकऱ्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे. काहींना वाटत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकासआघाडीची सभा होऊ नये असे वाटत होते. हे कसले राजकारण आहे असा सवाल देखील त्यांनी केला.

त्यांच्या लोकांकडून अनेक महापुरुषांची बदनामी झाली. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का? सावरकरांबाबत काहीतरी बोललं गेलं. पण वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितल्यानंतर ते वातावरण निवळलं. इथे गौरवयात्रा काढायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही दुटप्पी राजकारण करत आहात. छत्रपतींचे नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आले नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही.

Back to top button