छत्रपती संभाजीनगर: कोरोनाबाधित वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: कोरोनाबाधित वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एच३ एन २ (इन्फल्युएंझा) आजारापाठोपाठ कोरोनानेही पाय पसरायला सुरूवात केली आहे, शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी (दि.24) छत्रपती संभाजीनगरातील सुंदरवाडी येथील 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.

सुंदरवाडी येथील ही महिला गेल्या महिन्याभरापासून सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने त्रस्त होती. तिला श्वास घेण्यास अडचण तसेच खोकल्यात बेडकं पडणे आणि महिन्याभरापासून तिचा ताप काही कमी होत नव्हता. यावर उपचार घेण्यासाठी तिच्या कुटुंबाने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. लक्षणे पाहून, 17 मार्चरोजी तिच्या लाळेचे नमुने घेऊन तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तिची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. गोपाळ कुडलीकर यांनी दिली.

तसेच सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील 75 वर्षीय पुरुष रुग्ण हा 17 मार्चरोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 21 मार्चला छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव येथील एक 65 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी मृत्यू झालेल्या 65 वर्षीय महिलेने कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेले होते. मार्च-2021 मध्ये पहिला डोस, तर नोव्हेंबर-2021 मध्ये दुसरा डोस घेतला होता, बुस्टर डोस तिने घेतलेला नव्हता, अशी माहिती डॉ. कुडलीकर यांनी दिली आहे. या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना लक्षणे आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे, तसेच सुंदरवाडी परिसरात सर्वे करून ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार असल्याचे डॉ. कुडलीकर यांनी सांगितले.

ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असल्यास जास्त दिवस अंगावर काढू नका, डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार घ्या, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button