Chia Crop : वसमत तालुक्यात चिया पिकाची लागवड; बागायती व जिरायती शेतीला उत्तम पर्याय | पुढारी

Chia Crop : वसमत तालुक्यात चिया पिकाची लागवड; बागायती व जिरायती शेतीला उत्तम पर्याय

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : Chia Crop : वसमत तालुक्यातील शेतकरी सातत्याने आपल्या शेतीमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग करीत असतात. यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी तब्बल 14 एकर क्षेत्रावर सुपर फुड मानल्या जाणार्‍या चिया पिकाची लागवड केली आहे. बागायती व जिरायती शेतीला उत्तम पर्याय म्हणून या पिकाकडे पाहिले जात आहे.

वसमत तालुक्यातील अनेक गावांतील प्रयोगशील शेतकरी विविध नाविण्यपूर्ण पिकांची लागवड नेहमीच करतात. सुपर फुड मानल्या जाणार्‍या चिया पिकाबद्दल माहिती मिळाल्यानंतर रमाकांत भागानगरे आणि अशोक चेपूलवार यांनी मध्यप्रदेशातील निमच येथे जावून चियाचे बियाणे विकत आणले. रमाकांत भागानगरे यांनी सहा एकर, चंद्रकांत भागानगरे यांनी दोन एकर, संजय बाहेती, अशोक चेपुलवार, विनोद झंवर यांनी प्रत्येकी एक एकर, भेंडेगाव येथील बाबुराव भेंडेगावकर यांनी तीन एकर अशी सहा शेतकर्‍यांनी मिळून चौदा एकरवर चियाची लागवड केली आहे. पिकाचा कालावधी केवळ तीन महिने आहे. या पिकाची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात येते.

Chia Crop : चिया सुपर फुड

वसमत तालुक्यातील शेतकर्‍यांना 15 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चियाची लागवड केली. दोन ओळीतील अंतर अठरा इंच ठेवण्यात आले. यासाठी केवळ चार वेळा पाणी द्यावे लागले. एकरी पाच ते सात क्‍विंटल उत्पादन अपेक्षित आहे. यंदाचे उत्पादन लक्षात घेऊन पुढील हंगामात या पिकाची वसमत तालुक्यासह जिल्हाभरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्‍त होऊ लागला आहे. चिया हे सुपर फुड असून यामध्ये दुधापेक्षा सहा पट कॅल्शियम असते. हे पिक सध्या महाराष्ट्रात नवीन असले तरी हळुहळू या पिकाचे पेरणी क्षेत्र वाढेल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

पिकाच्या संगोपनासाठी अत्यल्प लागवड खर्च येतो. रासायनिक खते व किटकनाशकाचा मर्यादीत वापर होतो. परिणामी लागवड खर्च कमी येत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सध्या चिया पिकाला प्रतिक्‍विंटल बारा ते पंधरा हजार रूपयांचा दर आहे. दराबाबत निश्‍चित काही सांगता येत नाही. परंतू, सरासरी पंधरा हजार रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्यास हे पिक शेतकर्‍यांना परवडणारे ठरेल. उत्पादन किमान एकरी सात क्‍विंटल झाल्यास या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळतील असे रमाकांत भागानगरे यांनी सांगितले.

Chia Crop : ‘चिया’ रब्बी हंगामात ठरेल इतर पिकांना पर्याय

वसमत तालुक्यासह जिल्हाभरात रब्बी हंगामात हरभरा, गहु, ज्वारी या पिकाची पेरणी केली जाते. परंतू, सातत्याने हरभरा व इतर पिकांची लागवड केली जात असल्याने पारंपारिक पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. रब्बी हंगामात चिया हे इतर पिकांना पर्यायी पिक म्हणून उपलब्ध झाले आहे. चांगला उतारा व बाजारात दर मिळाल्यास या पिकाकडे शेतकरी वळतील असे चित्र आहे.

कोल्हापूर : वन जमिनींवर होणार काजू लागवड

कोल्हापूर : कार्यक्षेत्रातील शेतकरीही बाजार समितीला उमेदवार

Back to top button