

मुदखेड; पुढारी वृत्तसेवा : मुदखेड परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या ताब्यात सापडला. या वादळी वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला गहू, हरभरा, हळद पीक वाया गेले. त्यांच्या नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
तालुक्यातील बारड, डोंगरगाव, शेंबोली, खांबाळा, ईजळी, सीता बोरगाव, आदी गावात कमी अधिक प्रमाणात गारपिटीसह वादळी वारे पाऊस झाला. यात देऊबाई भालेराव व गणेश भालेराव राहणार बोरगाव सीता येथील असून या दोघांशेजारी वीज पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना बारड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पंढरी वडेपल्ली राहणार शेंबोली हे सुद्धा जोरदार वाऱ्यामुळे घरावरील उडालेल्या पत्र्याचा मार लागून जखमी झाले असल्याचे कळते. रोहि पिंपळगाव (शंकरनगर) येथील शेतकरी दत्ता बालाजी कोकणे (वय 35) हे शेताकडे जात असताना जोरदार वारा सुटल्यामुळे त्यांच्या पाठीवर झाड पडल्याने कमरेला जबर मार लागला आहे. पुढील उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल मुदखेड या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.