संभाजीनगर : अजिंठा परिसरात हवामानातील बदलामुळे पिकांच्या काढणीला वेग ! | पुढारी

संभाजीनगर : अजिंठा परिसरात हवामानातील बदलामुळे पिकांच्या काढणीला वेग !

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा दिवसांपूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून अजिठा परिसरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. याचा शेतातील गहु, मका, हरभरा, सुर्यफुल असे विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे.

रब्बी हंगामातील जी पिके काढण्यासारखी असतील ते काढण्यावर भर दिला जात आहे. गहू, हरभरा आदी पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. कारण प्रत्येक शेतकरी गहू काढण्यासाठी घाई करीत आहे. त्याला पर्याय म्हणून यंत्राच्या सहाय्यानेच पिके काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची धावपळ होत असून मका , सूर्यफुल , गहू, हरभरा आदी पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा बदलणाऱ्या हवामानाकडे लागले आहे. आपले नुकसान होणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना कायम सतावत आहे. दिवसा ऊन व रात्री गारवा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्‍यान, शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे भल्या पहाटेच अनेक शेतकऱ्यांनी गव्हाच्या कापणीस सुरवात केली. कधी पाऊस पडेल याचा नेम नसल्याने गहू झाकण्यासाठी पाणकापडदेखील खरेदी करण्यात आले आहे.बहुतांशी शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, आदी पिकांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झाले आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज

शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे . अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्याता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button