बीड : मांजरा पुलावर सापडला बेपत्ता युवकाचा मृतदेह; आत्महत्या की खून नातेवाईकांचा संशय | पुढारी

बीड : मांजरा पुलावर सापडला बेपत्ता युवकाचा मृतदेह; आत्महत्या की खून नातेवाईकांचा संशय

केज; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई येथील चनईमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला २७ वर्षीय तरुण पवन रामराव गोचडे याचा मृतदेह कळंब पोलीस ठाणे हद्दीत मांजरा नदीच्या पुलावर आढळून आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई जवळील चनई येथून पवन रामराव गोचडे हा दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी दि. ८ मार्च रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. दरम्यान (दि. ९) रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास मासे धरणाऱ्या लोकांना केज-कळंब रस्त्यावरील मांजरा नदीच्या पुलाजवळ प्रेत तरंगत असताना आढळून आले. कळंब पोलिसांनी सदर प्रेत पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी अंबाजोगाई पोलिसांच्या मदतीने बेपत्ता युवकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलावून घेतले असता हा मृतदेह पवन गोचडे याचा असल्याची ओळख पटली असून सदर मृतदेह हा चनई ता. अंबाजोगाई येथील पवन रामराव गोचडे वय (२७ वर्ष) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिंगनवाड, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस नाईक गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवीला आहे.

सदर बेपत्ता प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरकुंडे हे तपास करीत आहेत. मयताचा रिक्षा मांजरा पुलावर आढळल्याने पोलिसांना संशय होता. चनई ता अंबाजोगाई येथून बेपत्ता असलेला युवक पवन गोचडे याचा रिक्षा (दि. ८ मार्च) रोजी बेवारस स्थितीत आढळून आला होता.

नातेवाईकांना संशय

मयत पवन गोचडे याच्या प्रेताची ओळख पटविणाऱ्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पवनचा घात झाला असावा असा संशय पोलीस अधिकाऱ्याकडे व्यक्त केला आहे.

Back to top button