पैठण : व्हायरल व्हिडिओतील १ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या चोरांना अटक | पुढारी

पैठण : व्हायरल व्हिडिओतील १ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या चोरांना अटक

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील कचनेर गावाकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याची १ लाख २९ हजार रुपये लुटमार केल्याची घटना शनिवारी (दि.४) घडली. घटनेच्या व्हायरल व्हिडिओवरुन पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले.

दोन युवकांनी लुटमारीच्या उद्देशाने एका व्यापाऱ्याचा पाठलाग केला. आब्दुलपुर तांडा फाट्याजवळ व्यापाऱ्याची १ लाखांची रोकड लुटली. मात्र काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना पकडले, त्यानंतर ही रक्कम नंतर परत मिळाली. संबंधित व्यापाऱ्यांनी पैसे परत मिळाल्याने पोलिसांत याबाबतची कोणतीही तक्रार दिली नाही. पण काही नागरिकांनी घटनास्थळावरील लूटमार प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे या घटनेची दिवसभर चर्चा होती. पाचोड पोलीसांनी या व्हिडिओची दखल घेऊन रविवारी (दि. ५) रात्री उशिरा लुटमार झालेले व्यापारी शितल श्रीपाल पटणी (रा. कचनेर) यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पटणी यांनी तक्रार दिली आणि आरोपी आकाश नारायण सोनवणे (रा. पोलीस कॉलनी जवळ चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर) व सुदर्शन भगवान घुगे (रा. अंतरवाली खांडी ता.पैठण) या दोन आरोपींना अटक केली.

पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांना सत्यता पडताळून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल, सपोनि संतोष माने, प्रभारी सपोनि प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी तपास लावून या आरोपीला अटक केले आहे.

Back to top button