Team W-20 : झिंगाटवर थिरकल्या परदेशी पाहुण्या; टीम डब्ल्यू-२० चा हॉटेल ताजमध्ये जल्लोष

Team W-20 : झिंगाटवर थिरकल्या परदेशी पाहुण्या; टीम डब्ल्यू-२० चा हॉटेल ताजमध्ये जल्लोष

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : जी-२० परिषद निमित्ताने शहरात आलेल्या विविध देशांच्या महिला सदस्यांनी सोमवारची रात्र मोठ्या उत्साहात साजरी केली. हॉटेल ताजच्या हिरवळीवर आयोजित रात्रीच्या भोजन व संगीत कार्यक्रमात अनेकींना झिंग-झिंग झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्यासोबतच काहींनी नाशिक ढोलच्या तालावर लेझीमचा ठेका धरत जल्लोष केला.

वूमन-२०परिषद आयोजनाचा सन्मान छत्रपती संभाजीनगरला मिळाला आहे. त्यानिमित्त जी-२० सदस्य देशांतील महिला सदस्य शहरात दाखल झाल्या. सोमवारी सकाळी ९.३० पासून ते रात्री ८ वाजेदरम्यान सात सत्रात परिषदेचा पहिला दिवस पार पडला. यात महिलांच्या सक्षमीकरणासह विविध विषयांवर मंथन झाले.

पहिल्या दिवसाच्या सत्रानंतर विविध देशांच्या पाहुण्यांसाठी हॉटेल ताजमध्ये रात्रीच्या भोजनासह संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एका पथकाने नाशिक ढोलच्या तालावर लेझीमचे नृत्य सादर केले. ते बघून परदेशी पाहुण्याही लेझीम खेळल्या. यानंतर झिंगझिंगझिंगाट गाणे लागताच पाहुण्यांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही. स्टेजसमोर येऊन सर्वांनी झिंगाटवर ठेका धरला तब्बल अडीच ते तीन तास ताजच्या हिरवळीवर जल्लोषात करीत भोजनाचा स्वाद घेतला. यावेळी ढोलताशा, कोळी नृत्य पथकांनी नृत्य सादर केले होते.

फेटा बांधून स्वागत

भोजन व संगीत कार्यक्रमासाठी हॉटेल ताजमध्ये दाखल झालेल्या परदेशी पाहुण्यांचे भारतीय परंपरेनुसार फेटा बांधून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांना येथील संस्कृतीची माहिती देण्यात आली.

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

ग्रामीण भागात कशा पद्धतीने स्वयंपाक केला जातो. त्यासाठी आवश्यक मसाले व भाकरी कशा तयार केल्या जातात, याचा प्रत्यक्ष अनुभव परदेशी पाहुण्यांना देण्यात आला. त्यासाठी झोपड्या तयार करून त्यात पाटा, वरवंटा ठेवण्यात आला होता. तसेच चूलही पेटविण्यात आली होती. काहींनी पाट्यावर मसाला वाटून बघितला, तर काहींनी भाकर बनविण्याचा अनुभव घेतला.

logo
Pudhari News
pudhari.news