बीड; पुढारी वृत्तसेवा : पुणे- नगर रस्त्यावर कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले. मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालक गंभीर जखमी झाला.
अपघातात सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) या चौघांचा मृत्यू झाला. चालक अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून कारेगाव मधील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेन च्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.
शिक्षण आणि गुणवत्तेत कित्तेक वर्षांपासून नावलौकिक असलेले डोमरी गुरुकुल सुदाम भोंडवे यांनी सुरू केले होते. अतिशय दुर्गम भागात गुरुकुल उभारून ऊसतोड मजूर, शेतकरी कुटुंबातील विध्यार्थ्यांचे शिक्षण आणि पालन- पोषण सुदाम भोंडवे करत होते. अशा या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले सुदाम भोंडवे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर तिघे अशा चौघांचा अपघाती मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.