

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेच्या माजी राज्य सचिव तथा माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांचे मंगळवारी (दि.7) दुपारी 3.45 वाजता चिखलठाणा विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. त्यांच्या सोबत आलेल्या सुरक्षा रक्षकासह त्या तेथून थेट वेरूळकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिलरी क्लिंटन यांना जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच येणार होत्या. परंतु, त्याच वेळी जगभरात कोरोना महामारीला सुरुवात झाल्याने हा दौरा टळला होता. मंगळवारी दुपारी त्यांचे 3.45 वाजता त्यांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई येथे अमेरिकन दुतावासातील अधिकारी, कर्मचारी विमानतळावर उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांसाठी अमेरिकेच्या दुतावासाची 26 सीसी 836 ही गाडी तैनात होती तर हिलरी क्लिंटन व त्यांचे सहकारी एमएच-20 ईजी- 9922 या वाहनांत बसून वेरूळकडे रवाना झाले.
हिलरी क्लिंटनच्या सुरक्षेसाठी विविध चौकात पोलिसांच्या फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर विमानतळावरही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान यावर पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांची नजर होती. क्लिंटन विमानतळावर येताच त्यांचे विमानतळ प्राधिकरणचे डी.जी. साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले.