अदानींमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात; के. चंद्रशेखर राव यांचा केंद्र सरकारवर घणाघात | पुढारी

अदानींमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात; के. चंद्रशेखर राव यांचा केंद्र सरकारवर घणाघात

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : खोटी व बनावट कागदपत्रे दाखवून अदाणींच्या कंपन्यांनी 10 लाख कोटींचा घोटाळा केला. यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था पुर्णपणे धोक्यात आली असून या घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली. एवढा प्रचंड घोटाळा उघडकीस येऊनही बोलघेवडे पंतप्रधान शांत कसे असा सवाल करत त्यांनी राजकीय इच्छाशक्ती असल्यास अशा घोटाळ्यांवर नियंत्रण आणता येते, असा दावा केला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी नांदेडमध्ये त्यांच्या भारत राष्ट्रीय पक्षाचा प्रवेश सोहळा घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. बीआरएस केंद्रात सत्तेवर आल्यानंतर वीज, पाणी आणि अन्य बाबतीतील सर्व धोरणे 100 टक्के बदलणार असल्याची घोषणा केसीआर यांनी केली. केसीआर म्हणाले केंद्रातील सरकारे खासगीकरणाच्या नावाखाली नफ्यातील उद्योग आपल्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालत असून नुकसानीतील उद्योगासाठी मात्र जनतेच्या खिशात हात घातला जात आहे. प्रत्येक बाबतीत धर्म आणि जातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. देशात शांतता नांदावयाची असेल तर ही विचारधारा बदलावी लागणार असून आमच्या पक्षाचा हाच मुख्य अजेंडा आहे.

महाराष्ट्रासारख्या सक्षम अर्थव्यवस्था असलेल्या राज्यातील शेतकरी आत्महत्या करतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपला देश कृषीप्रधान असूनही शेतीला पाणी आणि वीज दिली जात नाही. देशात वीज आणि पाणी मुबलक असून देशातील 41 लाख करोड हरीत जमिनीला दररोज आणि नियमित पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणात कोळसाही उपलब्ध असून शेतीसह सर्वच क्षेत्रांना 24 तास वीज पुरवठा करण्याची क्षमता निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर केला जात नसल्याने जनतेला अऩेक संकटांना सामोरे जावे लागते.

देशात महिला सक्षमीकरणाच्या केवळ गप्पा केल्या जातात. परंतु काही देशांनी महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य दिल्यामुळे ते आज प्रगतीपथावरआहेत. आमचा पक्ष सत्तेवर आल्यास संसद, प्रत्येक राज्याच्या विधानसभा ज्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे त्या प्रत्येक ठिकाणी महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केसीआर यांनी यावेळी केली. या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्षात केली जाईल, असे केल्यानेच पुर्ण परिवर्तन होईल, असा दावा केसीआर यांनी केला आहे.

बाभळी बंधार्‍याच्या पाण्यावरून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांमध्ये भांडणे लावली जात आहेत. प्रत्यक्षात गोदावरी नदीतील दरवर्षी अडीच ते तीन हजार टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. मात्र एक टीएमसीपेक्षा कमी असलेल्या बाभळी बंधार्‍याच्या पाण्यावरून राजकारण केले जाते. आम्हाला कोणाचे हक्काचे पाणी घ्यायचे नाही. महाराष्ट्राचे मंत्री आमच्याकडे आल्यास बाभळी बंधार्‍याच्या पाण्याचा प्रश्‍न सर्वसंमतीने निकाली काढू असे आश्‍वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले.

Back to top button