हिंगोली : सोन्याचे आमिष दाखवत शिवारातून काढले पितळी शिक्‍के; दोघांना अटक | पुढारी

हिंगोली : सोन्याचे आमिष दाखवत शिवारातून काढले पितळी शिक्‍के; दोघांना अटक

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यात सवना शिवारात शेतात अर्धा किलो सोने असल्याचे सांगून एक लाख रुपये घेऊन शेतातील खड्ड्यातून पितळी शिक्के काढून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात आज (शुक्रवार) पहाटे गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील सवना येथील अमोल कैलास साळवे यांचे सवना शिवारात शेत आहे. त्यांच्या शेताच्या बाजूलाच टनका (जि. वाशीम) येथील संतोष उद्धव गवळी यांचे शेत आहे. शेतातील कामाच्या निमित्ताने त्यांचे नेहमीच बोलणे होत होते. काही दिवसांपूर्वी संतोष याने अमोल साळवे यांना तुमच्या शेतात सोने असल्याचे सांगितले. सोने काढून देण्यासाठी 1 लाख रुपये द्यावे लागतील असे त्‍याने सांगितले. शेतात एका विशिष्ट ठिकाणी खड्डा खोदल्यानंतर तेथे असलेल्या पितळी तांब्यात सोने असल्याचेही सांगितले.

त्यानंतर अमोल साळवे यांनी संतोष व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना 1 लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे संतोष गवळी याच्यासह रफीक पठाण, माधव कांबळे (रा. तोंडगाव,जि वाशीम) व अन्य चार ते पाच जण बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शेतात आले. यावेळी माधव याने मला सोने दिसले असून, खड्डा खोदण्यास सांगितले. त्यानुसार रात्री खड्डा खोदकाम करून त्यांनी एका पितळी तांब्यातून काही शिक्के काढून दिले. सदर शिक्के सोन्याचे आहेत असे सांगून ते अमोल यांच्या जवळ दिले व 1 लाख रुपये घेऊन तेथून काढता पाय घेतला. रात्रीच्या वेळी अमोल याने पितळी तांब्या घेऊन घर गाठले.

त्यानंतर त्यातील शिक्यांची पाहणी केली असता, ते पितळी शिक्के असल्याचे स्पष्ट झाले. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने टनका येथे जाऊन संतोष याचा शोध सुरु केला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर त्याने शुक्रवारी पहाटे गोरेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संतोष गवळी, रफीक पठाण, माधव कांबळे व इतर पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार कुंदर्गे, अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने दोन जणांना अटक केली आहे.

हेही वाचा :  

Back to top button