देगलूर, पुढारी वृत्तसेवा: दरोडेखोरांनी एका वृद्धेचा खून करत 3 लाख 89 हजार रूपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केले. ही घटना शहरातील लालबहादूर शास्त्री नगरात सोमवारी (दि.23) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून श्वान पथकालाही चोरट्यांचा माग काढता आला नाही.
येथील ज्येष्ठ नागरिक श्रीपतराव रामजी पाटील यांचे देगलूर- उदगीर रोडवरील लाल बहादूर शास्त्री नगरात घर आहे. मागील काही वर्षांपासून श्रीपतराव पाटील त्यांची पत्नी चंद्रकलाबाई पाटील (वय 60 ) यांच्यासह तेथे राहतात. त्यांचे उर्वरित कुटुंब येडूर येथे राहते. सोमवारी मध्यरात्री त्यांच्या घरात तीन दरोडेखोरांनी प्रवेश केला.
दरोडेखोरांनी प्रथम श्रीपतराव पाटील यांचे पाय बांधले. त्यानंतर चंद्रकलाबाईचे पाय व तोंड कपडाने बांधले. कपाटात ठेवलेले ५ तोळे सोन्याचे कडे, ७० तोळे चांदीचे वाळे काढून घेतले. दरोडेखोरांनी चंद्रकलाबाईचा खून करुन त्यांच्या अंगावरील एका तोळ्याचे सोन्याचे मणी, दीड तोळ्याची बोरमाळ, ५ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असे एकूण साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व ७० तोळ्याचे वाळे, असा एकूण ३ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती येथील नागरिकांने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. पहाटेपर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
तपास कामासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु, उदगीर रोडवर 1 किलोमीटर जाऊन श्वान थांबले. दरम्यान, श्रीपतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे करत आहेत. या घटनेमुळे देगलूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देगलूरला भेट दिली. विभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी तपास सुरू केला आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेर्याची पाहणी केली असता त्यात एक उंच व दोन मध्यम उंचीचे अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचे तरुण एका हॉटेलकडे जाताना दिसून येत आहेत.
हेही वाचलंत का ?