परभणी: पंचायत समिती आवारात सरपंच, माजी पदाधिकाऱ्यात फ्रीस्टाईल हाणामारी

File Photo
File Photo

जिंतूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धमधम येथील विद्यमान सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य यांच्यामध्ये गावातील विविध कामांची बिले काढण्यावरून वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये पंचायत समिती आवारामध्येच फ्री स्टाईल हाणामारी झाली. यावेळी एकमेकांच्या अंगावर चप्पल आणि बूट भिरकावण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे दोघेही एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, धमधम या गावातील पांदण रस्ते व विहिरीच्या कामांची बिले काढण्यावरून सरपंच वाल्मीक टाकरस व पंचायत समितीचे माजी सदस्य केशव घुले यांच्यात वाद झाला.

गावामध्ये १९ सिंचन विहिरीची व ५ पाणंद रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे बिले काढू नये, अशी तक्रार यापूर्वीच पंचायत समितीमध्ये दाखल झालेली होती. त्यामुळे तांत्रिक अधिकारी शिल्पा घाटूळ व विस्तार अधिकारी नंदकिशोर आडते व रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी ज्ञानोबा भिसे कामांची तपासणी करण्यासाठी धमधम गावाकडे निघाले होते. यावेळी केशव घुले अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. या दरम्यान सरपंच वाल्मीक टाकरस तिथे आले. त्यांनी अधिकार्‍यांना सांगितले की, पाणंद रस्त्यांची बिले अगोदर काढा. त्यानंतर विहिरीच्या कामाची बिले काढा. यावरून घुले आणि टाकरस यांच्यामध्ये हाणामारी झाली. या भांडणानंतर गावात सुद्धा दोन्ही गटात धुमश्चक्री झाली.

संबंधित कामांची चौकशी तत्कालीन विस्तार अधिकारी ढोणे यांनी या पूर्वीच केलेली आहे. त्यामुळे या सर्व कामांची बिले काढणे क्रमप्राप्त आहे. अशी भूमिका मी घेतली. लाभार्थ्यांच्या तक्रारी माझ्यापर्यत आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मला पुढाकार घेणे आवश्यक आहे. मी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करताना सरपंचांनी मध्ये बोलून अडथळा आणला. सरपंच टाकरस गावातील राजकारणात विरोधकांना बळ देत आहेत, असा आरोप घुले यांनी यावेळी केला.

सरपंच वाल्मीक टाकरस म्हणाले की, केशव घुले यांच्याकडून विकास कामांबाबत अनेक विनाकारण तक्रारी केल्या जात आहेत. तसेच मला मानसिक त्रास दिला जात आहे. विहीर, रस्त्यांच्या कामाबाबत बिनबुडाच्या तक्रारी दिल्यामुळे बिले मिळण्यास विलंब होत आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news