परभणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ऊस भुईसपाट; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान | पुढारी

परभणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ऊस भुईसपाट; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

ताडकळस : पुढारी वृत्तसेवा : ताडकळस व परिसरातील शिवारात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन, वेचनीस आलेला कापूस तसेच मोसंबी फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल विभागाने सरसकट पंचनामे केले नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे तत्काळ सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पूर्णा तालुक्यातील ताडकळस, कळगाव, कळगाववाडी, धानोरा काळे, मुंबर, गोळेगाव, माहेर, बानेगाव, सिरकळस, खांबेगाव, तामकळस, महागाव, महापुरी, एखुरखा, फुलकळस, माखणी, खंडाळा या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वर्षाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे.

शेतात शिल्लक राहिलेले पीक काढण्याची लगबग सुरू झाली आहे. परंतु अजूनही शेतात वापसा मिळत नाही. यामुळे रब्बी पेरणी लांबण्याची चिन्हे आहेत. त्यातच खरिपातील पिकांवर झालेला मोठा खर्चाचा बोजा कमी झाला नाही. त्यातच संपूर्ण नुकसान होऊन ही शासनाकडून मदतीचे आणखी कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. रब्बी पिकांची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यामुळे तत्काळ शासनाने ठोस आर्थिक मदत द्यावी, तसेच पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

काढणीला आलेले सोयाबीन, वेचणीला आलेला कापूस पावसामुळे खराब झाला आहे. मोठा खर्च करूनही हातचे पीक गेल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने दिपावलीचा सण व रब्बी पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

रंगनाथराव भोसले, शेतकरी (ताडकळस, कळगाव, ता. पूर्णा)

हेही वाचलंत का ? 

Back to top button