परभणी, पुढारी वृत्तसेवा : पालम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या नावाखाली २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणार्या पालम येथील सहायक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सोमवारी (दि.१०) ताब्यात घेतले. नामदेव उमाजी राठोड असे या सहायक फौजदाराचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, पालम पोलीस ठाण्यात तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना तपासकार्यात मदत करतो, असे आश्वासन देत त्यासाठी २५ हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी सहायक फौजदार नामदेव राठोड (ढवळकेवाडी ता. गंगाखेड) यांनी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने या मागणीविरोधात परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे २३ ऑगस्टरोजी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने त्याच दिवशी लाचेची मागणी होत असल्याची पडताळणी केली होती.
या पडताळणीतून सहायक फौजदार राठोड ते पैसे मागत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे त्यांना २५ हजार रूपये देण्याचे ठरवून पथकाने कारवाईचा प्रयत्न केला. मात्र, राठोड यांना याबाबत शंका आल्याने त्यांनी ती रक्कम स्वीकारली नाही. मात्र पथकाने मागणीच्या आधारे राठोड यांना सोमवारी ताब्यात घेतले. यासाठी विभागाचे उपअधीक्षक किरण बिडवे, निरीक्षक बसवेश्वर जकी कोरे, निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचलंत का ?