बीड : चोरट्यांनी एकाच रात्री लुटली गावातील तीन घरे | पुढारी

बीड : चोरट्यांनी एकाच रात्री लुटली गावातील तीन घरे

गेवराई पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दरोडेखोरांच्या टोळीने दहशत निर्माण केली आहे. तालुक्यातील खामगाव येथे दरोडेखोरांनी गावातील एका घराचा दरवाजा तोडून महिलेला मारहाण करत दागिने लंपास केले आहेत. सदरच्या दरोडेखोरांनी गावात आणखी दोन ठिकाणी अशीच दहशत निर्माण करून मारहाण केली. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी याच परिसरातील गोपाळ वस्ती याठिकाणी अशाच चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटालूट केली होती. दरोड्याच्या घटनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

तालुक्यातील खामगाव येथे मध्यरात्री चार चोरट्यांनी मधुमाला रमेश वाघ (वय ४५) या महिलेचे घर टार्गेट करत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महिलेला मारहाण करत चाकुचा धाक दाखवत दोन ग्रॅमचे डोरले, दोन ग्रॅमचे कानातील फुलं, एक ग्रॅमचे कुडुक, पायातील चैन, एक मोबाईल असा ऐवज लुटला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील अंकुश रावसाहेब पोटभरे यांच्या घराकडे वळविला. पोटभरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र मधुमाला रमेश वाघ या महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्याच गाावातील प्रवीण दिलीपराव मचे यांच्या घरात प्रवेश करत प्रवीण मचे यांच्या आई शिलाबाई यांना चाकुचा धाक दाखवून रोख पाच हजारांसह मोबाईल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. गावात एकच खळबळ उडाल्याने संपूर्ण गाव रात्रभर जागे होते. तीन ठिकाणी चोर्‍या होऊनही पोलिसांनी सकाळपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button