औरंगाबाद: एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ११ तास बंद | पुढारी

औरंगाबाद: एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ११ तास बंद

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सोमवारी पहाटे चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. पंपगृहातील फिडरमध्ये उंदीर घुसल्याने स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे पंपिंग बंद झाल्याचे समोर आले. त्यानंतर लगेचच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या घटनेमुळे अकरा तास पाणीपुरवठा बंद राहिला.

पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १०० एमएलडी आणि ५६ एमएलडीच्या दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. दोन्ही पाणी योजनांसाठी जायकवाडी धरणात पंपगृह उभारण्यात आलेले आहे. या पंपगृहात सोमवारी पहाटे २ वाजून ५ मनिटांनी अचानक विद्युत पुरवठा खंडित होऊन पूर्ण पंपींग बंद झाली. शंभर एमएलडी योजनेच्या पंपगृहातील मेन पॅनलची तपासणी केली असता पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे स्पार्किंग होऊन फेज टू फेज अर्थ फॉल्ट झाला. व सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याचे आढळले. त्यानंतर नवीन जायकवाडी पंपगृह येथील पुरवठा बायपास करून ५६ एमएलडी योजना पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी सुरू करण्यात आली.

१०० एमएलडी योजना संपूर्ण काम झाल्यानंतर दुपारी १ वाजता सुरू झाली. परिणामी ५६ एमएलडी योजनेवर २ तास १५ मिनिटे आणि १०० एमएलडी योजनेवर ११ तास ५ मिनिटे खंडणकाळ राहिला. या काळात धरणातून पाणी उपसा होऊ शकला नाही. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान शहरातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button