बीड : गुटखा किंग अशोक सक्राते पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

बीड : गुटखा किंग अशोक सक्राते पोलिसांच्या जाळ्यात

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा :बीड जिल्ह्यासह परराज्यात गुटख्याची तस्करी करण्यात बदनाम असलेला गुटखा किंग अशोक सक्राते पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.29) दुपारी गुटख्याची वाहतूक करणारी पकडली. यानंतर पोलिसांनी अशोक सक्राते याला ताब्यात घेतले. त्याच्या माजलगावातील गोडाऊनची झाडाझडती घेतली जात आहे.

माजलगाव शहरातील पॉवर हाऊस रोडवर महाराष्ट्र राज्याने घातलेल्या गुटख्याची पीकअप जीपमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सापळा रचून पासिंग नंबर नसलेला पिकअप ताब्यात घेऊन तपासणी केली असता आतमध्ये 21 पोते तंबाखूजन्य पदार्थाचे मिळून आले. ज्याची किंमत पाच लाखांच्या आसपास असल्याचे समजते.

यावेळी पोलिसांनी चालक किशोर शिंदे यास ताब्यात घेऊन माल कोणाचा? अशी विचारणी केली असता त्याने गुटखा किंग अशोक सक्राते याचे नाव सांगितले. गुटखा तस्करीत अशोक सक्राते हा चांगलाच बदनाम असल्याचे बोलले जात असून तो बीड जिल्हयाचा नव्हे तर परराज्यातही गुटख्याची तस्करी करतो, अशी चर्चा आहे.

दरम्यान, पोलिसांनी अशोक सक्राते यास ताब्यात घेऊन त्याच्या माजलगाव येथील गोडाऊनची झाडाझडती घेत आहेत. ही कार्यवाही सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे, पोलिस नाईक शिवदास घोलप, विकास काकडे, विनायक कडू, किशोर गोरे, बालाजी बाष्ठेवार, गणपत पवार यांनी केली.

Back to top button