अंबाजोगाईत पोलिस ठाण्यातच मागितली व्यापार्‍याला खंडणी | पुढारी

अंबाजोगाईत पोलिस ठाण्यातच मागितली व्यापार्‍याला खंडणी

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत योगेश्वरीचे दागिने चोरीसह परराज्यात गुन्हे करणार्‍या मोहन मुंडे याने सराफा व्यापार्‍याच्या दुकानात जाऊन त्यांना 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. याची तक्रार करण्यासाठी व्यापारी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांच्या समोर व्यापार्‍याला फोन करून त्याने पुन्हा धमकी दिली. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली असून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाई शहारातील मोहन मुंडे याने रविवारी (दि.28) मंडी बाजारातील जगदंबा रिफायनरी या सोन्याचे दगिने तयार करणार्‍या दुकानात जाऊन कारागीर अनिल विलास शिंदे यांना 5 लाख रुपये दे अन्यथा महानंदी व आंध्रप्रदेशात चोर्‍या केलेला माल तुझ्या दुकानात विकल्याचे पोलिसांना सांगेल, असे धमकावले. सकाळपर्यंत 5 लाख न दिल्यास सारे कुटुंब रात्रीतून खत्म करू असेही तो म्हणाला.

या प्रकारानंतर शिंदे यांनी सराफा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत मुंडे यांच्याशी संपर्क करून व्यापार्‍यांना सोबत घेत पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, खंडणीचा गुन्हा दाखल होत असताना पोलिसांनी मोहन मुंडेला ठाण्यात पकडून आणले. स्थानिक गुन्हा शाखेच्या कक्षात त्याला बसवले असता त्याने ठाण्यातून धूम ठोकली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने फिर्यादीस फोन करून त्यांच्या कुटुंबाला रात्रीतून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. हा सारा प्रकार पोलिस ठाण्यात पोलिसांच्या समोरच घडला.

यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पो. नि.बाळासाहेब पवार यांनी पथक नियुक्त करून मोहन मुंडेला जेरबंद करण्यासाठी रवाना केले. चोरीतील दागिने अंबाजोगाईत विकल्याची बतावणी करून तो येथील व्यापार्‍याला खंडणी मागत आहे. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात मोहन मुंडे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. ना. एम. एम. भोले करीत
आहेत.

गुन्हेगारांच्या त्रासाला व्यापारी वैतागले

अट्टल गुन्हेगार जेव्हा चोर्‍या करतात, तेव्हा त्यांना पोलिस पकडतात. मुद्देमालाची विचारणा होते. अशा वेळी संबंधित गुन्हेगार विविध दुकानदारांचे नाव घेतात. हा प्रकार पोलिस तपासाचा भाग असला तरी अंबाजोगाई येथील काही गुन्हेगार व्यापार्‍यांची खोटी नावे सांगून त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात. माल विकत घेतला नसला तरी व्यापार्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. गुन्हेगारांच्या या त्रासामुळे धंदा बंद करण्याची वेळ आली असल्याचे सराफा असोसिएशनचे श्रीकांत मुंडे यांनी सांगितले.

Back to top button