परभणीत आढळला युवकाचा मृतदेह | पुढारी

परभणीत आढळला युवकाचा मृतदेह

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गंगाखेड रोडवर असलेल्या गोरक्षण जागेवर सोमवारी (दि.29) सकाळच्या सुमारास एका 20 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला असून या तरूणाचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. यशपाल गोविंद यादव (वय 20, रा. रमाबाई आंबेडकर नगर, परभणी) असे मृताचे नाव आहे.

रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास यशपाल याने आईला बाहेर जावून येतो, असे सांगून तो निघून गेला होता. पण सोमवारी सकाळपर्यंत तो घरी परत आलाच नाही. नातवेाईकांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह गोरक्षण जागेवर आढळला. याची माहिती मिळताच कोतवाली ठाण्यातील पोलिस निरीक्षक शरद जर्‍हाड, सपोनि. रामेश्वर तुरनर, कर्मचारी गायकवाड, पोले, भोळे, जंगम, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला.

यशपाल याच्या गळयावर धारदार शस्त्राचे वार झाल्याचे पहावयास मिळाले. जेथे मृतदेह आढळला तेथे दारूच्या बॉटलच्या काचेचे तुकडे पोलिसांना दिसले. यावरून यशपालचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आह परभणी शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे. विशेषत: गुन्हेगारी कृत्यात युवकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येते.

Back to top button