

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा गावाजवळ दोन वाहनांच्या धडकेत एक महिला ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) रात्री आठ वाजता घडली. शोभा दरक (४५, रा.नांदेड) असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नांदेड येथील काहीजण त्यांच्या कारने (MH 26-AR-7020) हिंगोली येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. हिंगोली येथे कार्यक्रम आटपून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते परत नांदेडकडे निघाले होते. त्यांची कार हिंगोली ते औंढा मार्गावर लिंबाळा पाटीजवळ आली असता, समोरून वेगात येणार्या जिपने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातामध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातात कारमधील शोभा दरक व अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान या सर्वांना तातडीने हिंगोली येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शोभा दरक यांचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रूग्णालयाच्या पथकानने जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर उपचार सुरू केले. त्यापैकी एका महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. एन. मळघने यांच्या पथकाने भेट दिली आहे.
हेही वाचा