महाराष्ट्राबद्दल चुकीचे वक्तव्य करून राज्यपालांनी वाद निर्माण करू नये : अजित पवार | पुढारी

महाराष्ट्राबद्दल चुकीचे वक्तव्य करून राज्यपालांनी वाद निर्माण करू नये : अजित पवार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः राज्यपालांनी महाराष्ट्राबद्दल चुकीचे वक्तव्य करून राज्यात वाद निर्माण करू नये, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार वसमत येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. वसमत तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर  अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजीमंत्री धनंजय मुंडे, जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजेश नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळी पवार म्हणाले की, राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती आहेत. त्यांनी एक तर तातडीने मंत्रीमंडळ स्थापन करावे अन्यथा त्यांच्या अडचणींची माहिती जनतेला सांगून टाकावी. राज्यात अतिवृष्टीमुळे पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकर्‍यांच्या हाती काहीही लागणार नाही असे चित्र आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी हेक्टरी 75 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य संभ्रमात टाकणारे आहे. अखंड महाराष्ट्रासाठी शंभर पेक्षा अधिक जणांनी हौतात्म पत्करले आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा राज्याची संस्कृती असून आजपर्यंतचा इतिहास आहे. महाराष्ट्रा विना राष्ट्र न चाले हे त्यांनी लक्षात ठेवावे. विनाकारण चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करू नये. राज्यपालांच्या बोलण्याचा अर्थ कदाचीत वेगळा असेल पण त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण आले नाही. मात्र, अशा प्रकारचे वक्तव्याच्या वेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होतात त्यावेळी तातडीने याचे स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केले पाहिजे ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button