औरंगाबाद : चौदाशे रुपयांच्या वाटणीवरून १६ वर्षीय युवकाचा खून; दारू पाजून घोटला गळा | पुढारी

औरंगाबाद : चौदाशे रुपयांच्या वाटणीवरून १६ वर्षीय युवकाचा खून; दारू पाजून घोटला गळा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादेतील खुनाचे सत्र सुरूच आहे. चोरलेला लोखंडी पाईप विकून आलेल्या चौदाशे रुपयांच्या वाटणीवरून वाद झाल्यानंतर दोन नशेखोर तरुणांनी 16 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केला. शनिवारी (दि. 11) जाधववाडी जंगलात घडलेली ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी चार वाजता उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींना पकडल्यानंतर ही उकल झाली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

युसूफ असदउल्ला खान (16, रा. गल्ली क्र. ४, कैलासनगर) असे मृताचे तर, सय्यद आमीर सय्यद सलीम (21, रा. दादा कॉलनी) आणि फेरोज युनूस शेख (26, रा. कैलासनगर) अशी आरोपींची नावे आहेत. युसूफ हा हातगाडीवर कपडे विकायचा तर आमिर हा हमाल असून फेरोज खासगी चालक आहे.

पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितले, शुक्रवारी आरोपी फेरोज आणि मृत युसूफ यांनी लोखंडी पाईप चोरला होता. हा पाईप विक्री करून त्यांना चौदाशे रुपये मिळाले होते. ही रक्कम फरोजकडे होती. त्याचे हिस्से वाटप झाले नव्हते. त्यामुळे शनिवारी आरोपी फरोज व आमीर हे दोघे युसूफ भेटले. त्यांनी आज पैशांची वाटणी करू आणि दारू पिऊ, असे सांगून त्याला जाधववाडीतील जंगलाकडे बोलावले. त्याप्रमाणे फेराज दारू, पाणी, सोडा, चकना घेऊन गेला. आमीर आणि युसून तेथे पोचले. जाधववाडीतील जंगलात ते दारू पिले. तेथेच त्यांचा वाद सुरु झाला. आमीर व फेरोजने मिळून युसूफला मारहाण केली. तसेच, रुमालाने युसूफचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह घटनास्थळाहून अंदाजे 200 मीटर घनदाट जंगलात नेऊन टाकला.

जिन्सी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा 

दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर गेलेला युसूफ खान घरी परतला नाही. शनिवारची रात्र, रविवारी दिवसभर व रात्रीही नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, युसूफचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर युसूफचे वडील असदउल्ला शफीउल्ला खान यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली. युसूफ अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पथकाचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला.

असा लावला छडा 

जिन्सी भागातील १६ वर्षीय युसूफ खान तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने उपनिरीक्षक तांगडे यांनी तपासाला सुरुवात केली. तो शेवटचा कोणासोबत होता, त्याचे मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली. यात तो आमीरसोबत असल्याचे माहिती मिळाली. तसे, फुटेजही प्राप्त झाले होते. त्यावरुन मंगळवारी उपनिरीक्षक अनंता तांगडे, अंमलदार सुनील जाधव, नंदूसिंग परदेशी, शेख जफर, संतोष शंकपाळ, संतोष बमनात यांनी आमीरला उचलले. त्याची चौकशी केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, फुटेजसारखा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसांनी त्याला खाक्या दाखविला. त्यानंतर तो बोलता आणि आणि त्याने फेरोजचे नाव सांगितले.

पोलिसांनी फेरोजलाही पकडले. त्यावर जाधववाडी जंगलात युसूफ असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना सोबत घेऊन जाधववाडी जंगल गाठले. तेथे तपासणी सुरु केली. मात्र, बराचवेळ काहीच सापडले नाही. आरोपीदेखील बोलत नव्हते. जंगलाच पोलिसांनी कसून चौकशी करीत युसूफचा मृतदेह शोधून काढला. शनिवारीच त्याचा खून केलेला असल्याने मंगळवारपर्यंत दुर्गंधी सुटली होती. घटनास्थळी उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, प्रभारी निरीक्षक संभाजी पवार यांनी पाहणी केली.

हे ही वाचलंत का? 

Back to top button