

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा सलग 21 दिवसांचा खंड पडल्यामुळे शेतकर्यांना पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
आमदार चव्हाण यांनी १ सप्टेंबरला मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. खरीप हंगाम 2023 मधील सद्यपरिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगांव, पैठण, फुलंब्री व इतर तालुक्यात जुन-जुलै-ऑगस्ट 2023 दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकर्यांना पीकविमा योजनेतील मिडसिझन ऍडव्हर्सिटीअंतर्गत 25 टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात देण्याची तरतूद आहे. यासाठी पावसाचा 21 दिवसांचा खंड असावा, अशी अट आहे. सदरील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगांव, पैठण, फुलंब्री व इतर तालुक्यात जुन-जुलै-ऑगस्ट 2023 दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांना सांगितले. पवार यांनी यांसदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.