हिंगोली : पोलीस कर्मचार्‍याच्या सतर्कतेने बेपत्ता मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन | पुढारी

हिंगोली : पोलीस कर्मचार्‍याच्या सतर्कतेने बेपत्ता मुलगी कुटुंबियांच्या स्वाधीन

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरात आलेली तीन वर्षाची मुलगी खेळत खेळत बाजारात आली अन रडू लागली. यावेळी पोलीस कर्मचारी रुपेश धाबे यांनी सतर्कता दाखवत त्या मुलीस सोबत घेऊन पोलीस ठाण्याला माहिती दिली अन् सोशल मीडियावरही संदेश पाठविले. त्यानंतर अवघ्या दीड तासात मुलीच्या वडिलांचा शोध लागला आणि मुलगी त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. मुलीला पाहताच वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. हा प्रकार (बुधवारी दि. ५) मे रोजी घडला.

तालुक्यातील लोहगाव येथील संतोष महाजन हे त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी श्रावणी हिच्यासह बुधवारी सकाळी हिंगोलीत आले होते. यावेळी पाहूण्यांकडे गेले असताना श्रावणी बाहेर खेळत होती. त्यानंतर खेळता खेळता ती बाजारात आली. मात्र बाजारातील गर्दी पाहून ती रडू लागली. यावेळी शहरात कर्तव्यावर असलेल्या वाहतुक शाखेचे कर्मचारी रुपेश धाबे यांनी त्या मुलीची चौकशी केली. तर तिच्या सोबत फिरणार्‍या मुलाकडेही विचारणा केली. मात्र सदर मुलगी मला सापडली असून तिच्या कुटुंबाचा शोध घेत असल्याचे मुलाने सांगितले.

या प्रकारानंतर पोलिस कर्मचारी धाबे यांनी मुलीस सोबत घेतले. शहरात एक मुलगी सापडल्याची माहिती हिंगोली शहर पोलीस ठाण्याला दिली अन् त्यानंतर सोशल मीडियावरही त्या मुलीचे छायाचित्र अपलोड केले. या शिवाय अंबिका टॉकीज भागात त्या मुलीच्या कुटुंबियांचा शोध सुरु केला. त्यानंतर दीड तासातच संतोष महाजन अंबिका टॉकीज भागात आले. त्यांनी धाबे यांच्याशी संपर्क साधून श्रावणी त्यांची मुलगी असल्याचे सांगितले. वडिलांना पाहताच श्रावणी त्यांच्या गळ्यातच पडली अन् बेपत्ता झालेली मुलगी सापडल्याने संतोष महाजन यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्यांनी पोलीस कर्मचारी धाबे यांचे आभार मानले.

हेही वाचलंत का?

Back to top button